नायगाव | प्रतिनिधी
नायगाव तालुक्यात पावसाअभावी सोयाबीनचे पीक वाळून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींबरोबरच गुराढोरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत MIDC कृष्णूर येथे सोयाबीन गुळीची खरेदी करून प्लांट चालवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित प्लांट बंद करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष साई पाटील मोरे देगावकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदा पावसाअभावी शेतातील सोयाबीन पीक वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, दुसरीकडे जनावरांसाठी चारा उपलब्ध करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर कृष्णूर एमआयडीसी येथील सोयाबीन गुळीच्या प्लांटमध्ये नेमके काय सुरू आहे, सोयाबीन गुळीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात आहे आणि संबंधित कामकाज नियमांनुसार सुरू आहे का, याची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चौकशीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित प्लांटवर नियमानुसार कठोर कारवाई करून तो बंद करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी आणि पशुधनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका!
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि पशुधनाच्या प्रश्नाला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष झाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा साई पाटील मोरे देगावकर यांनी दिला