नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे
नायगाव तालुक्यातील बरबडा शिवारात रविवारी (दि. २५) सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा अखेर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून,संभाजी मालोजी इर्लेवाड रा.मारतळा असं या दुचाकीस्वाराचे नाव आहे.या घटनेनंतर संबंधित ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करून तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान बरबडा येथून कहाळयाच्या दिशेने कार जात होती. बरबडा गाव ओलांडल्यानंतर पांदण रस्त्यावरून एक दुचाकी मुख्य रस्त्यावर येत असताना कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकी कारखाली अडकून काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, कहाळा येथून बरबड्याकडे जाणारा एक ऑटोरिक्षा नेमका याच क्षणी त्या अपघातात सापडला आणि पलटी होत रस्त्याच्या बाजूला पडला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात ऑटोरिक्षातील एकूण सात प्रवासी किरकोळ जखमी झाले,कुणाच्या हाताला कुणाच्या पायाला,डोक्याला मार लागला आहे.मात्र दैव बलवत्तर म्हणून हे सर्वजण या अपघातात बचावले.कारमध्ये असलेले दाम्पत्य आणि लहान बालकाच्या शरीराला इजा झाली असली तरी गाडीचे एअरबॅग खुलल्याने ते सुखरूप आहेत.दुचाकीस्वार मात्र गंभीर जखमी होता.नांदेड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.परंतु,उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.या भीषण अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून,ऑटो आणि कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघात घडलेल्या ठिकाणी शेताकडे जाणारा आणि पुनर्वसन भागातील घरांकडे जाणारा असे दोन पांदण रस्ते कहाळा-बरबडा रस्त्याला मिळतात. या परिसरात झाडेझुडपे असल्यामुळे पांदण रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालकांना या रस्त्यावरील वाहने सहजपणे दिसत नाहीत आणि मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही पांदण रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही.या रस्त्यावरील उतार आणि वाहनांचा वेग लक्षात घेता, संबंधित ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वर्षानुवर्षे या भागात रस्ते नव्हते आता रस्ते चकाचक झाले पण असे अपघात घडल्यावर जूनं तेच सोनं म्हणायची वेळ यनिमित्ताने निर्माण झाली आहे.हा रस्ता दोन वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने करखेलीच्या एका गुत्तेदाराकडून करुन घेतला आहे.त्यामुळे संबंधित प्राधिकरणाने घटनास्थळाची पाहणी करून देखभाल दुरुस्ती अंतर्गत याठिकाणी तात्काळ दोन गतिरोधक बसून देण्याच्या सूचना संबधित गुत्तेदाराला द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.