नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
दुष्काळाच्या झळांनी शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, संकटाच्या काळात मदतीचा हात देत माणुसकी जपण्याचा उपक्रम नायगाव विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर बांधवांच्या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी माहेरच्या मायेने पुढाकार घेत भाजपच्या वतीने ‘भांड्यांचा सेट’ भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा नायगाव विधानसभा मतदार संघात व्यक्त होत आहे.
भाजपचे आमदार राजेश संभाजी पवार आणि सौ.पुनमताई राजेश पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती एका जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. मुलीच्या लग्नात संसारोपयोगी वस्तूंची जुळवाजुळव करताना कुटुंबावर आर्थिक भार पडतो. अशा वेळी लग्नासाठी आवश्यक असलेल्या भांड्यांचा संच भेट देऊन कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
हा उपक्रम १ जानेवारी २०२७ ते ३१ मे २०२७ या कालावधीत होणाऱ्या लग्नसमारंभांसाठी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतमजूर बांधवांच्या कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.दुष्काळ, शेतीतील अनिश्चितता आणि वाढता कौटुंबिक खर्च यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर मुलामुलींचे विवाह पार पाडण्याचे आव्हान उभे राहते. अशा परिस्थितीत संसारोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात मिळणारी मदत कुटुंबांसाठी उपयोगी ठरू शकते.संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरत आहे.