नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (MKCL) तर्फे इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ (MOM) या विशेष स्पर्धा परीक्षेचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमाच्या परिपूर्ण तयारीसोबतच भविष्यातील NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक असणारा मजबूत पाया (Foundation) तयार होण्यास मदत होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील १६६ अधिकृत केंद्रांवर (MS-CIT, KLiC व Satellite Centers) ही परीक्षा राबवली जात आहे. मागील एका महिन्यात या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत:
जिल्हा पातळी (प्रत्येक इयत्तेनुसार): प्रथम – ₹२,५००, द्वितीय – ₹१,५००, तृतीय – ₹१,००० राज्य पातळी (एकूण १५ विजेते): प्रथम – ₹५,०००, द्वितीय – ₹४,०००, तृतीय – ₹३,००० नांदेड जिल्ह्यातील ५ वी ते ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा,नावनोंदणीची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२६ असून,अधिक माहितीसाठी आपल्या जवळील अधिकृत एमकेसीएल केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन नांदेड जिल्हा एमकेसीएल कार्यालयाकडून करण्यात आले आहे.