नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे
नायगाव तहसील कार्यालयातील अभिलेख विभागातून फेरफार नोंदींच्या नक्कली मिळवण्यासाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम मागितली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येक अर्जासाठी १६० रुपये मागितले जात असून, अधिकृत पावती दिली जात नसल्याची तक्रार पत्रकार एकता महासंघाचे मराठवाडा सचिव दीपक माधवराव गजभारे यांनी केली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासकीय कागदपत्रांसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत असल्यास हा अन्यायकारक प्रकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. फेरफार नक्कलीसाठी शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्क स्पष्ट करावे, शुल्काची यादी कार्यालयात लावावी आणि प्रत्येक रकमेसाठी पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, नांदेड आणि उपविभागीय अधिकारी, बिलोली यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.